महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 16, 2019, 11:47 PM IST

ETV Bharat / state

ना एसटी... ना रस्ता मग कशाला मताची भीक मागता; सुनेगावकारांचा मतदानावर बहिष्कार

अहमदपूर शहरापासून केवळ ६ किमी अंतरावर असणाऱ्या सुनेगावात अजूनपर्यंत एकदाही रस्ता झालेला नाही. त्यामुळे या गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे.

सुनेगावकारांचा मतदानावर बहिष्कार

लातूर - देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झाले तरी अहमदपूर शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुनेगावच्या (शेंद्री) रस्त्याचे काम अद्यापपर्यंत झाले नाही. त्यामुळे या गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्यासाठी सामूहिक शपथ घेतली आहे.

सुनेगावकरांच्या प्रतिक्रिया

अहमदपूर शहरापासून केवळ ६ किमी अंतरावर एक हजार लोकवस्ती असलेले सुनेगाव डोंगरदऱ्यात वसले आहे. या गावात अजूनपर्यंत एकदाही रस्ता झालेला नाही. २ वर्षांपूर्वी गावकऱ्यांनीच लोकसहभागातून गावासाठी मुरूमाचा रस्ता केला. मात्र, काळाच्या ओघात हा रस्ता खराब झाला. सध्या या ठिकाणी पाऊलवाट आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान सडक योजनेत गावाचा सहभाग असून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या अभावी गावातील लोकांना २५ किमी वळसा घालून शहराच्या ठिकाणी जावे लागत आहे. तसेच यामुळे विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध नागरिक आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे.

गावात रस्ता नसल्यामुळे २०१७ च्या पंचायत समिती निवडणुकांमध्येही गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातला. मात्र, २ वर्षानंतरही या रस्त्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांचा आक्रोश पाहून एकाही उमेदवाराने प्रचारासाठी गावची वेस ओलांडली नाही. बहिष्कार मागे घेण्याच्या उद्देशाने मंगळवारी जिल्हा प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार गावात दाखल झाले होते. मात्र, या अधिकाऱ्यांच्या समोरच ग्रामस्थांनी मतदान करणार नसल्याची सामूहिक शपथ घेतली. त्यामुळे ऐन वेळी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनाही निर्णयाविनाच परतावे लागले. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी मात्र, हा राज्यघटनेचा अपमान असल्याचे सांगत निवडणुकानंतर रस्त्याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले. ग्रामस्थांनी आपला निर्णय मागे घेऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details