लातूर - निसर्गाचा लहरीपणा जिल्ह्यातील नागरिक अनुभवत आहेत. पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी रात्री झालेल्या पावसात लातूर तालुक्यातील गातेगाव परिसरातील ऊसाचे उभे फड आडवे झाले. उसाबरोबर सोयाबीन आणि खरिपातील इतर पिकांचेही नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील मांजरा पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची गवड होते. पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने पिढ्यान-पिढ्या या भागातील शेतकरी उसाचेच उत्पन्न घेतात. ऊस ऐन बहरात असतानाच अचानक सोमवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मांजर पट्ट्याच्या परिसरातील ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गातेगाव परिसरातील ऊसाचे उभे फड आडवे मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस लातूर जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशातच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. उडीदाची काढणी अंतिम टप्प्यात असतानाच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
गेल्या 10 महिन्यापासून शेतकऱ्यांनी ऊसाची निगी ठेवली होती. मात्र, रात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पीक भूईसपाट झाले आहे. परिसरातील शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. गतवर्षीही सोयाबीन काढणीच्या वेळीच पावसाने हजेरी लावली. त्यावेळी सर्व सोयाबीन पाण्यात गेले होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. लातूर तालुक्यातच नव्हे तर जळकोट, अहमदपूर आणि औसा तालुक्यातही वरुण राजाची अवकृपा झाली आहे.