लातूर - सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी भोसले यांच्या नावाचे स्पेलिंग चुकले आहे. ही बाब कोणी शिक्षक, तज्ज्ञाने नाहीतर वर्गातील मुलीनेच निदर्शनास आणून दिली. मात्र, शिक्षकांनी तिचे कौतुक न करता 'फी'चे कारण पुढे करत वर्गातून हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार लातुरातील माउंट लिटरा झी स्कूलमध्ये घडला आहे. एवढेच नाही तर, वर्गातून हाकलल्याचा आरोप शाळेने फेटाळला आहे.
शिवाजी महाराजांच्या नावाची स्पेलिंग चुकली; मात्र पुस्तकातील चुका दाखवणाऱ्या विद्यार्थिनीलाच मिळाली शिक्षा..
सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता सातवीच्या समाजशास्त्र विषयात छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी भोसले या महापुरुषांच्या नावातील स्पेलिंग चुकले आहे. याबद्दल विद्यार्थीनीने संबंधित शिक्षकांना माहिती दिली मात्र शिक्षकांनी तिचे कौतुक न करता 'फी'चे कारण पुढे करत वर्गातून हाकलून लावले.
इयत्ता सातवीच्या समाजशास्त्र विषयात छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी भोसले या महापुरुषांच्या नावातील स्पेलिंग चुकले आहे. संबंधित धडा शिकवला जात असताना वर्गातील समृद्धी करपे या विद्यर्थीनीच्या ही बाब लक्षात आली. याबद्दल तिने संबंधित शिक्षकांना माहिती दिली. मात्र, तू एवढी हुशार झालीस की आम्हालाच चुका सांगायला लागलीस असे म्हणत 'फी'चे कारण पुढे करीत वर्गातून हाकलून दिल्याचा आरोप या मुलीने केला आहे. त्यामुळे विद्यार्थिनीकडून चूक निदर्शनास आणून दिल्यास त्यामध्ये सुधारणा करणे अपेक्षित असताना शिक्षकाकडून अशा प्रकारे वागणूक दिल्याने रोष व्यक्त केला जात आहे.
महापुरुषांच्या नावात स्पेलिंग मिस्टेक झाल्याचे या शाळेचे प्राचार्य बी.क्यू. जेकब यांनी मान्य केले असले तरी मुलीला शाळेतून हाकलून दिले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय चूक दुरुस्त कारण्यासंदर्भात वरिष्ठांना कळिवले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.