लातूर - यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन राज्य सरकारकडून केले जात आहे. काही नामांकीत महाविद्यालयात या अत्याधुनिक पद्धतीला सुरूवातही झाले आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील गरीब घरच्या विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न कायम आहे. ग्रामीण भागातील 50 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोनच नाही तर त्यापैकी अनेकजण ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत अनभिज्ञ आहेत. ही स्थिती आहे शहरापासून 6 किमी अंतरावर असलेल्या आणि पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभळगावची....
विशेष : आम्हाला शिकायचंय...पण ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय? पालकमंत्र्यांच्या गावातील अवस्था - बाभळळगाव न्यूज
यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन राज्य सरकारच्यावतीने केले जात आहे. काही नामांकीत महाविद्यालयात या अत्याधुनिक पद्धतीला सुरूवातही झाली आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील गरीब घरच्या विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न कायम आहे.
आम्हाला शिकायचे तर आहेच पण ही ऑनलाईन शिक्षण पद्धती काय असते असा सवाल या विद्यार्थी आणि पालकांनी केल्याने ही पद्धत किती यशस्वी ठरेल हा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय तांत्रिक अडचण आणि महिन्याकाठी मोबाईल रिचार्ज याचे काय हे देखील स्पष्ट नाही. डिजिटल शाळा, संस्था या केवळ नावालाच राहिल्या आहेत. प्रत्यक्षात संगणक आणि शासनाकडून देण्यात आलेले टीव्ही हे अडगळीला पडले आहेत. काळाच्या ओघात शिक्षण पद्धतीत बदल झाला आहे. ऑनलाईनचा वापर सर्व ठिकाणी होत असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी, तांत्रिक अडचणी आणि महिन्याकाठी यावर होणारा खर्च याचा देखील विचार होणे तेवढेच गरजेचे आहे. बाभळगाव येथील शाळेलगतच असलेल्या वस्तीमधील विद्यार्थ्यांकडे ना स्मार्ट मोबाईल आहेत ना त्यांना ऑनलाईन शिक्षणपद्धतीची माहिती. केवळ शिक्षण घ्यायचे हेच त्यांना माहिती आहे. त्यामुळे या अत्याधुनिक पद्धतीला ते कसे सामोरे जातील किंवा सरकारकडून यांना काय मदत होईल हे पाहावे लागणार आहे. कारण पालकमंत्र्यांच्या गावचीच ही अवस्था असेल तर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे काय? हा सवाल कायम आहे.
सध्या नामांकित महाविद्यालय आणि खासगी क्लासेस चालकांनी या ऑनलाईन पद्धतीचा वापर सुरू केला आहे. तरी जिल्हा परिषद आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी या प्रवाहाच्या बाहेर आहेत हे नक्की...