लातूर - जिल्ह्यासह मराठवाड्यातील सोयाबीन हे खरिपातील प्रमुख पीक आहे. सोयाबीन काढणीच्यावेळी अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी आवक कमी असल्याने सोयाबीनने चार हजाराचा टप्पा ओलांडला आहे. असे असतानाही लातूर कृषी उतपन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी केवळ १५ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे.
दर वाढूनही सोयाबीनची आवक घटलेलीच... हेही वाचा -निसर्गाची अवकृपा कायम; ढगाळ वातावरण अन् रिमझिम पावसाने पिकांचे नुकसान
हंगामाच्या सुरवातीला ३ हजार ८०० क्विंटल असलेल्या सोयाबीनचा दर आता ४ हजार ४०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शेतकऱ्यांसाठी जरी ही बाब दिलासादायक असली तरी अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. शिवाय भविष्यात दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीन साठवणुकीवरच भर दिला आहे. दर वर्षी हंगाम सुरु होताच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४० हजार क्विंटलपर्यंत आवक होत असते. यंदा मात्र, यात घट झाली असून सध्या १५ हजार क्विंटलचीच आवक होत आहे.
हेही वाचा -निन्म तेरणा प्रकल्पाच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी; ४० गावातील शेतकऱ्यांना होणार लाभ
येथील बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न समितीमधील व्यवहार पाहता केवळ जिल्ह्यातूनच नाही तर संबंध मराठवाड्यातून सोयाबीनची आवक होते. ५ वर्षात प्रथमच ४ हजार ५०० च्या घरात सोयाबीनचा दर गेला आहे. असे असूनही सध्या दर वाढले असले तरी पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीनची बाजारात आवक होताना दिसत नाही. भविष्यात ५ हजारापर्यंत दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पावसामुळे सोयाबीन डागाळलेले असल्याने त्याचाही फटका दरावर होताना दिसत आहे. मात्र, बाजारपेठेत २४ तासांत पैसे शेतकऱ्यांना मिळत असल्याने संबंध मराठवाड्यातून सोयाबीन आवक सुरु आहे. दरम्यान, भविष्यात सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.