लातूर-वाढदिवसाला आणलेल्या केकमध्ये चक्क साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात घडला आहे. केक खाणाऱ्या मुलांना मळमळ, उलट्या होऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर सबंधित बेकरी बंद ठेवण्यात आली आहे.
लातुरात आढळला चक्क केकमध्ये साप हेही वाचा-महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ
भाचीच्या वाढदिवसानिमित्त निजाम शेख यांनी लातूर शहरातील औसा रोडवरील एका बेकरीतून 8 मार्च रोजी केक खरेदी केला. वाढदिवस साजरा केल्यानंतर राहिलेला अर्धा केक त्यांनी फ्रिजमध्ये ठेवला. सोमवारी सकाळी लहान मुलांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, फ्रिजमध्ये ठेवलेला केक तपासला असता, त्यात साप आढळला आहे. निजाम यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र, बेकरी चालकाने याबाबत प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. शिवाय तक्रार झाल्यानंतर संबंधित बेकरी बंद ठेवण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी करीत आहेत.