लातूर - जिल्ह्यातील शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. पण पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे विक्रमी उत्पन्न होत तर मराठवाड्यात का नाही? यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत स्व. विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले होते. आता ते प्रत्यक्षात होत आहे. विलासराव देशमुख यांच्या पत्नी आणि विलास सहकारी कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकरी 135 टनांचे उत्पन्न घेतले आहे.
योग्य नियोजन
जिल्ह्यात मांजरा पट्टा हा ऊसाचे क्षेत्र म्हणून ओळखला जातो. सरासरी एवढा पाऊस झाला आणि मांजरा धरणाची पाणीपातळी वाढली तरच ऊसाचे क्षेत्र वाढते. पण पाण्याचे योग्य नियोजन आणि खताची मात्रा योग्य दिली तर पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच लातूर जिल्ह्यातही विक्रमी उत्पन्न घेता येते. वैशाली देशमुख यांनी बाभळगावातील शेतामध्ये हा प्रयोग केला आहे. याकरिता शेतीशी निगडित असलेल्या तज्ज्ञांचा त्यांना फायदा झाला असला तरी योग्य नियोजन केल्यावर हे शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यात साखर कारखाने आहेत पण सरासरी ऊसाचे उत्पन्न घेऊन येथील शेतकरी समाधानी आहेत. उलटार्थी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हे एकरी 150 टनांचे उत्पन्न घेतात. मग आपण का नाही, अशी खंत स्व. विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली होती. मात्र, आता त्यांची इच्छा पूर्ण होत आहे. त्यांच्याच शेतामध्ये एकरी 150 टन ऊसाचे उत्पन्न घेण्याचा निर्धार करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात 135 टन उत्पन्न झाले आहे. भविष्यात 150 टनापेक्षा अधिक उत्पन्न घेणार असल्याचा विश्वास वैशाली देशमुख यांनी व्यक्त केला आहे. याकरिता कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि कृषीतज्ज्ञांचे मत कामी आले आहे.
उत्पन्न वाढले तर शेतकऱ्यांना अधिकचा फायदा
ऊसाचे क्षेत्र वाढतेय, त्याप्रमाणे उत्पादनही वाढणे आवश्यक आहे. लातूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र हे 35 हजार हेक्टर एवढेच आहे. पण यंदा 1 लाख हेक्टरहून अधिक लागवड झाली आहे. त्यामुळे क्षेत्र तर वाढत आहेच, त्याचबरोबर उत्पन्न वाढले तर शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.