लातूर -उत्पादनापेक्षा लागवड खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांचे अर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे कर्जाचा भार वाढत असून राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शेती व्यवसायावरील बंधने हटवून बाजार आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्यावे, या मुख्य मागणीसाठी शेतकरी युवा संघटनेच्यावतीने गुरुवारी औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
निसर्गाचा लहरीपणा आणि प्रशासकीय धोरणे यामध्येच शेतकरी अडकला आहे. या परस्थितीला शेतीविषयक धोरणे आणि कायदे कारणीभूत असल्याचे संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी म्हटले होते. बाजारसमिती कायदा, अत्यावश्यक वस्तू कायदा, कमाल जमीन धारण कायदा यामुळे शेतकरी जेरीस आला आहे. त्यामुळेच आत्महत्या वाढत असल्याचा आरोप शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रुपेश लंके यांनी केला आहे.