लातूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लातूर येथील आयोजित कार्यकर्ता बैठकीमध्ये पक्ष सोडून गेलेल्यांचा चांगलाच समाचार घेतला. यापूर्वी 1980 साली 56 जण सोडून गेले होते. तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो आणि त्यांना घरीच बसविले होते. आता तुमची साथ असेल तर हे काम एका महिन्यातच करतो. पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय. यांनाही घरी बसविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
मराठवाडा दौऱ्यावर असलेले शरद पवार हे बुधवारी लातुरात दाखल झाले होते. शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारीला सरकारच जबाबदार आहे. यांच्यामध्ये योग्य निर्णय घ्यायची क्षमता नसल्याने याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. वर्षभरात 6 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण शहरात भटकत आहे. हे सरकारचे अपयश असून आता सत्ता परिवर्तनाची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - तुम्हाला कशी 'झक' मारायचीय ती मारा, शरद पवारांचा तोल सुटला
1980 साली मी परदेशातून परत आलो तेव्हा मला समजले होते की 58 पैकी 56 आमदार सोडून गेले होते. तेव्हा मी केवळ 5 जणांचा नेता होतो. तेव्हा मात्र राज्याचा कानाकोपरा पिंजून काढला आणि सोडून गेलेल्या एकालाही निवडून येऊ दिले नव्हते. आताही पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय. तुमची साथ असेल तर सोडून गेलेल्यापैकी एकालाही निवडून येऊ देत नाही. त्यांना घरीच बसविणार असल्याचा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.