निलंगा (लातूर) - निलंगा तालुक्यातील कोराळी येथील एकाच कुटुंबातील 6 कोरोनाबाधित झाले आहेत. मुंबईपासून त्यांच्या संपर्कात असलेल्या दहा जणांचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे. मात्र, ते विनापरवाना ज्या वाहनाने पोहचले त्या वाहनाचाही थांगपत्ता लागला नसल्याची बाब समोर आली आहे. कोराळी गाव 14 दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. तर, कोराळी शेजारचे कासार शिरसी गाव हे तीन दिवस बंद ठेवण्यात आले असून त्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
निलंगा तालुक्याच्या कोराळी येथील हे कुटुंब मुंबईत राहत होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईवरून हे कुटुंब कोणताही परवाना न घेता गावात येऊन घरामध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सरपंच कल्पना गायकवाड यांनी लागलीच त्यांच्या घराला बाहेरून टाळे ठोकले होते. नंतर त्यांना थेट रुग्णालयात पाठवल्यामुळे ह्या लोकांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. मात्र, मुंबईहून येताना वाहनामध्ये एकूण 16 लोक आले होते. त्यापैकी सहाजण कोरोनाबाधित झाले असून त्यांच्या संपर्कातील उर्वरीत दहा जणांचा शोध प्रशासन घेत आहे. तर, या 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती आहे.