निलंगा (लातूर) -सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी व स्थगिती उठेपर्यंत कोणत्याही प्रकारची नोकरभरती करण्यात येऊ नये. या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तास रास्तारोको आंदोलन करत मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले.
निवेदनात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. संभाजी सेनेच्या वतीने मराठा आरक्षणासाठी पहिल्या टप्प्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. सोमवारी (दि.28) दुसर्या टप्प्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.