लातूर - शहराला १० दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. मागील पाच महिन्यापासून हीच स्थिती असून १५ जूनपर्यंत पाणी पुरेल याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे. लातूर औद्योगिक भवनासह शहराला मांजरा धरणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या हे धरणही मृतसाठ्यात असून यामध्ये १४ दशलक्ष घटमीटर पाणी असल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख बामनकर यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील प्रमुख गावातील पाणीटंचाईचा आढावा मांजरा धरणाशिवाय इतर जवळचा पर्यायही नसल्याने गरज पडल्यास १० दिवसाचा पाणीपुरवठा १५ दिवसावर लांबू शकतो. आजही सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ५०० रुपयांना २ हजार लिटर पाण्याचे टँकर विकत घेण्याची नामुष्की लातूरकरांवर ओढावत आहे.
उदगीर तालुक्यात पाण्याचा साठा, गरज नियोजनाची
उदगीर शहराला तालुक्यातील देवर्धन आणि बनशेळकी धरणातील पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये म्हणून सध्या नागरिकांना १२ दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन नगरपालिकेने केले आहे. देवर्धन मध्यम प्रकल्पात केवळ ९ टक्केच पाणीसाठा असून बनशेळकी धरण हे मृतसाठ्यात आहे. हे दोन्हीही स्रोत निकामी झाल्यास वाघदरी आणि अरवलंकोज हे जलसाठे जिल्हा प्रशासनाने आरक्षित केले आहेत. यावरून भविष्यात टंचाई निर्माण झाली तर टँकरने पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे तालुक्यात पाण्याचे स्रोत असले तरी त्याचे नियोजन होणे आवश्यक आहे.
...तर औसा शहराला उस्मानाबाद जिल्ह्यातील धरणाशिवाय पर्यायच नाही
लातूर शहरापासून २५ किमी अंतरावर असलेल्या औसा शहराला उटी धरणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खालावत असल्याने शहराला १० दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. तर शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये मांजरा धरणातून पाणीपुरवठा होत आहे. जून महिना अखेरपर्यंत पाणी पुरवठा पुरेल, असा विश्वास नगरपालिकेने व्यक्त केला आहे. अन्यथा उस्मानाबाद जिल्ह्यातील माकणी धरणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना देखील या धरणावरून पाईपलाईनचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहे.
पाणीसाठा असूनही अहमदपूरकरांच्या घशाला कोरड
एकीकडे पाणीटंचाईमुळे एक घागर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या निगरगट्टपणामुळे अहमदपूरकरांना अशाच समस्येचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, नव्याने करण्यात येणाऱ्या पाईपलाईनचे काम रखडले आहे. त्यामुळे शहरात प्रशासकीय निर्मित पाणीटंचाई होत आहे. तब्बल ३५ दिवसांमधून एकदा पाणीपुरवठा या शहराला होत आहे. पाणीपुरवठ्यासाठी महानगरोत्थान योजनेतून ३९.५८ कोटीचा निधीही मिळाला आहे. मार्चपासून १० महिन्यात हे काम पूर्ण करावयाचे असल्याने आतापर्यंत केवळ ७ किमीचे काम झाले आहे. त्यामुळे खासगी टँकरच्या विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.