लातूर -यावर्षी नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत आज (शनिवारी)रेणापूर येथील रेणुकामाता मंदिरात सकाळी तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. याबरोबरच भाविकांच्या अनुपस्थितीत यंदाच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.
रेणापूर येथील रेणुकामाता हे केवळ लातूर जिल्ह्यातील नागरिकांचे नव्हे तर उस्मानाबाद, बीड तसेच कर्नाटक येथील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी भाविकांची रेलचेल, ढोल- ताशांचा गजर आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने घटस्थापना होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शनिवारी सकाळी विधिवत पूजा करून घटस्थापना केल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. तर नऊ दिवस केवळ पूजा केली जाणार आहे, अशी माहिती पुजारी श्रीकांत धर्माधिकारी यांनी दिली.