लातूर - खरिपाची पेरणी होताच जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. पिकांची वाढ होण्यासाठी पावसाची आवश्यकता असतानाच बुधवारी सायंकाळी वरुणराजाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांची वाढ अधिक जोमाने होणार असून रखडलेल्या पेरण्याही होतील, असा विश्वास शेतकऱ्यामधून व्यक्त होत आहे. यंदा वार्षिक सरासरीच्या तब्बल 30 टक्के पाऊस या महिन्याभरात झाला आहे.
लातूर जिल्ह्यात 4 लाख 91 हजार एवढे खरिपाचे क्षेत्र आहे. गेल्या महिन्याभरात 90 टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये सोयाबीन सर्वाधिक असून दुबार पेरणीचे संकट ओढवलेले क्षेत्र बाकी आहे. मात्र पेरणी होताच पावसाने दडी मारली. दरम्यानच्या कालावधीत शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकली होती. आता पावसाची आवश्यकता असताना बुधवारी लातूर शहरासह औसा, रेणापूर, चाकूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पीक वाढीला याचा उपयोग होणार आहे.
पहिल्या टप्प्यात बियाणाची उगवण न झाल्याने, तब्बल 7 हजार 56 हेक्टरवरील पिके बाधित झाले होती. या क्षेत्रावर पुन्हा दुबार पेरणी करण्यात आली. बुधवारी सायंकाळी अर्धा तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वार्षिक पावसाची सरासरी 721 मिमी असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 30 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यामधून समाधान व्यक्त होत आहे.