लातूर -हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील परतीचा पाऊसही नुकसानीचा ठरत आहे. सोयाबीनची काढणी सुरू असतानाच रेणापूर तालुक्यातील मोठेगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील पीक काढणीची कामे जोमात होती पण शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसाने उर्वरित पिके पाण्यात गेल्याचे चित्र आहे.
रेणापूर तालुक्यात पावसाचा कहर; सोयाबीन पाण्यात, ऊस आडवा खरिपात सर्व काही सुरळीत असताना गेल्या महिन्यापासून होत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गतमहिन्यातच जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे तर नुकसान झालेच होते. परंतु, गेल्या दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने काढणीच्या कामाला वेग आला होता. काढणीची कामे अंतिम टप्प्यात असतानाच परतीच्या पावसाचा फटकाही या पिकांना बसला आहे.
रेणापूर तालुक्यात सोयाबीनची काढणी करुन गंजी लावण्यात आल्या होत्या. मात्र, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने या गंजीच्या ढिगाऱ्याखालीही पाणी साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर उभा असलेला ऊसही आडवा झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला असला तरी तो नुकसणीचाच अधिक आहे. तीन महिने अथक परिश्रम करून जोपासलेले पीक आता पाण्यात बघून शेतकऱ्यांचा बांध फुटत आहे. एकरी हजारो खर्ची करूनही पदरी काय पडत नसल्याने जगावे तरी कसे असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
रेणापूर तालुक्यातील मोठेगाव येथे अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. शिवाय अजून तीन दिवस पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खरीप हंगाम यंदा पाण्यातच गेला आहे. लातूर ग्रामीण, औसा, रेणापूर तालुक्यातील पाऊस पाहता पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवारी सायंकाळीच अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर होते. पंचनामे करण्यात आले असले तरी उत्पादनाच्या तुलेनेत मदत मिळेल की नाही या चिंतेत शेतकरी आहे. सोयाबीनमधून उत्पादन तर सोडाच परंतु साधे बुस्कटही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही.