लातूर - खरिपापासून शेतकऱ्यांवर सुरू झालेली संकटाची मालिका रब्बी हंगामातही सुरूच आहे. हंगामाच्या सुरुवातीला दाट धुके आणि गेल्या ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण पसरले आहे. यातच गुरुवारी लातूरसह काही तालुक्यात पावसाचे आगमन झाले. रिमझिम पावसामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
खरिपातील नुकसान रब्बीत भरून काढण्यासासाठी सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला आहे. यामध्ये हरभरा २ लाख १७ हजार हेक्टर तर, ज्वारीचा पेरा ३३ हजार हेक्टरवर झाला आहे. अवकाळी पावसामुळे आधीच रब्बीच्या पेरणीला उशीर झाला होता. त्याचा परिणाम पीक वाढीवर होत असतानाच शेतकऱ्यांना पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. दाट धुक्यामुळे मध्यंतरी लष्करी आळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. यामध्ये फवारणी करून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस येवू लागला आहे.