लातूर - जिल्ह्यातील मुरुड हे लातूर-मुंबई महामार्गावरील एक मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. बसस्थानकात प्रवाश्यांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता आहे. येथील प्रविण पाटील या शिक्षकाने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त एक लाखापेक्षा जास्त पैसे खर्चून बोअरवेल घेत प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. एवढेच नाही तर 42 वृक्षांची लागवड केली आहे. यामुळे गावकऱ्यांसह प्रवाशी आनंद व्यक्त करत आहेत.
42 वृक्षांची केली लागवड-
मुरुड हे गाव लातूर मुंबई महामार्गावरील मध्यवर्ती गाव आहे. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तर बसस्थानक परिसरात घाण व दुर्गंधीचे मोठे साम्राज्य पसरलेले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती. हीच गरज ओळखून येथील जनता विद्यालयातील शिक्षक प्रविण पाटील यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शासनाकडून प्राप्त झालेला पीकविमा व एनसीसीच्या वार्षिक मानधनातून बसस्थानक परिसरात बोअरवेल घेऊन तिथं प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. सोबतच 42 वृक्षांची लागवड करून बसस्थानक परिसर सुंदर बनवला आहे. यासाठी एक लाखापेक्षा सुद्धा जास्त रक्कम खर्च केली आहे.