लातूर- दरवर्षी मार्च महिन्यात बळीराजा सुगीच्या कामात दंग असतो. मात्र, यंदा स्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांनी शेतात ज्वारीची पेरणी केली. परंतु पावसाच्या अभावी ज्वारी आलीच नाही. त्यामुळे रब्बीच्या उत्पादनात मोठी घट झाली असून चाराटंचाईचे मोठे संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे. जिल्ह्यात अद्याप एकही चारा छावणी सुरू झाली नसून जनावरे जगवायची कशी? असाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
रब्बी हंगामातील निम्मे उत्पादन घटले, चाऱ्यासह पाणीटंचाईचे भीषण संकट - संकट
दरवर्षी मार्च महिन्यात बळीराजा सुगीच्या कामात दंग असतो. मात्र, यंदा स्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांनी शेतात ज्वारीची पेरणी केली. परंतु पावसाच्या अभावी ज्वारी आलीच नाही.
कडब्याची १ पेंडी ४० रुपयांना, तर दुसरीकडे पशुखाद्याचे भावही दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा दुहेरी संकटाला जिल्ह्यातील शेतकरी सामोरे जात आहेत. रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९५ हजार हेक्टर असताना केवळ १ लाख २५ हजार हेक्टरवर रब्बीचा पेरणी झाली होती. पाणीटंचाई आणि अनियमित पाऊस यामुळे रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादन निम्म्याने घटले असून चाराटंचाईचा सामनाही शेतकऱ्यांना करावा लागत आहे. वाढते ऊन घटते, पाणी यामुळे शेतीपूरक व्यवसायांवरही परिणाम दिसून येत आहे.
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊनही योजनांची अंमलबजावणी झालेली नाही. केवळ शिरुर अनंतपाळ तालुक्यात मदत रकमेचे वाटप झाले आहे. केवळ २ टँकरने ३ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. वेळीच टँकरसह चारा छावण्या सुरू होणे गरजेचे आहे. पाणी आणि जनावरांना चारा कमी पडू देणार नसल्याचे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी लातूरमध्येच स्पष्ट केले होते. मात्र, आता दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होण्याची मागणी शेतकरी करत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातुर आहेत. सध्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यामुळे सत्ताधाऱ्यांना मात्र दुष्काळाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.