लातूर - झोपटपट्टीमुक्त शहर करण्याच्या उद्देशाने तीन ठिकाणी या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून महापालिकेने घरे बांधली. 12 वर्षांपूर्वी शहरातील जय नगर परिसरात उभारलेल्या चार इमारतींमध्ये 300 कुटुंब वास्तव्यात आहेत. मात्र, येथील स्वच्छता व गटाराकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
शहरातील मुख्य भागात असलेल्या झोपटपट्टीधारकांना आर्वी, जय नगर याठिकाणी जागा उपलब्ध करून घरे बांधून देण्यात आली होती. असे असले तरी, राजकीय स्वार्थ साधून ज्यांच्याशी सलगी आहे, अशाच नागरिकांना घरे मिळाल्याचा आरोप झोपटपट्टीत राहणारे नागरिक करत आहेत. तर दुसरीकडे, ज्यांना घरांचा लाभ मिळालेला आहे, त्यांच्या अडचणी कायम आहेत. काळाच्या ओघात या इमारतींची पडझड सुरू आहे. शिवाय, पावसाळ्यात गळतीही लागली आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर कामे होतात, पण ती कायमस्वरूपी होत नाहीत.