लातूर- संचारबंदी असतानाही एक ना अनेक मार्गाचा अवलंब करीत नागरिक मार्गस्थ होत आहेतच. असाच प्रकार लातुरातदेखील समोर आला आहे. पत्नी माहेरी असल्याने मुंबईच्या जावाईबापूने थेट सासरवाडी गाठली आणि प्रशासनाच्या निदर्शनास येऊ नये, म्हणून घरातच लपून बसणे उचित मानले. मात्र, चार दिवसानंतर का होईना मुंबईहून दाखल झालेल्या या जावईबापूंचे गुपित उघडे पडले असून आता त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
मुंबईहून जावाईबापू लातूरला आले अन् घरात लपून बसले..! शहरालगत असलेल्या मांजरा कारखान्याच्या परिसरात कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरे उभारण्यात आली आहेत. १४ एप्रिलला येथील कर्मचाऱ्याच्या घरी पाहूणा आला होता. मात्र, याचा थांगपत्ता ना शेजाऱ्याला ना प्रशासनाला लागला. चार दिवसांपासून या कर्मचाऱ्यांचा जावई घराबाहेर न येता दिवसरात्र घरातच राहत होता. मात्र चार दिवसांनी त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागला आणि हे गुपित असलेले बिंग फुटले.
मुंबईचे जावाई त्यांच्या पत्नीला भेटण्यासाठी आले असल्याचे शेजारच्या नागरिकांना माहिती झाले आणि या नागरिकांनी ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली. मुंबईहून एका रेल्वे मालगाडीत या महाशयाने कुर्डवाडीपर्यंत प्रवास केला आणि त्यांनतर खासगी वाहनाचा आधार घेत मांजरा कारखाना परिसरातील सासऱ्याचे घर गाठले होते. त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने येथील विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात त्यांचे स्वॅब घेण्यात आले होत. आता त्यांचा अहवाल काय येतो याकडे लक्ष लागले आहे.
जावईबापू अशा पद्धतीने सासरवाडी जवळ करतील याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय तपासणीसाठी त्यांचे स्वॅब घेतल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, कोरोनाशी लढण्यासाठी जो-तो घरात बसून आहे. मात्र, या जावयाने राज्याच्या राजधानीतून थेट सासुरवाडी गाठली आहे.