लातूर- कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम प्रत्येक क्षेत्रात झाला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्द, चिकाटी आणि अनोखा प्रयोग राबवून समाजसेवेबरोबर अर्थप्राप्तीचा पर्याय एका तरुणाने निवडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आणि भाजीपाल्याला योग्य मोबदला मिळत नसला तरी उत्पादक आणि ग्राहकामधला दुवा असणाऱ्या विक्रेत्याने एक अनोखी शक्कल लढवली आहे. भाजीपाला आणि फळविक्रीतून दिवसाकाठी हजारो रुपयांची कमाई करीत आहे.
विजय महाजनचा मूळ व्यवसाय फर्निचरचा पण सध्याच्या लॉकडाउनमुळे दुकान बंद ठेवावे लागत आहे. मात्र, बंद काळातली गरज ओळखून लॉकडाऊन जाहीर झाले की तिसऱ्याच दिवशी त्यांनी भाजीपाला आणि फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. एवढेच नाही तर लातूरसारख्या शहरात व्हाट्सअॅप आणि फेसबुकचा वापर करून त्यांनी ऑनलाईन बुकिंगही सुरू केली. सध्याच्या संचारबंदीत घरपोच भाजीपाला आणि फळे मिळत असल्याने महाजन यांच्या उपक्रमाला लातूरकरांनी पसंती दिली आहे.