लातूर - पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पुराचा हाहाकार माजला आहे. लातुरात मात्र पाण्यासाठी मोर्चे, आंदोलने करण्याची वेळ आली आहे. महिन्यातून एकदाही औसा शहराला पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ संबंध औसेकरांनी शहर बंदची हाक दिली.
पश्चिम महाराष्ट्रात पुराचा हाहाकार; लातुरात पाण्यासाठी मारामार - तावरजा धरण
पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे नागरिकांचे स्थलांतर केले जात आहे. दुसरीकडे लातुरात भर पावसाळ्यात 106 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, औसा शहरासाठी टँकरनेही पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती होत आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भर पावसाळ्यात 106 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, औसा शहरासाठी टँकरनेही पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती होत आहे. यापूर्वी तावरजा धरणातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे हे धरण कोरडेठाक आहे. यामुळे माकणी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी गेल्या 4 वर्षापासून औसेकर करीत आहेत. यासाठी 40 कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली होती. मात्र, प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने योजना रखडली आहे. याकडे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
पावसाळ्यात देखील विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. शहरातील सर्व जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत. पावसाळ्यात ही अवस्था, तर भविष्यात काय होणार? हा प्रश्न नागरिकांसमोर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. गुरुवारी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तर शुक्रवारी सर्व औसेकरांच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पाणीपुरवठ्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार कदम यांना देण्यात आले. तसेच शहराला सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास 13 ऑगस्टला रास्तारोको केला जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.