लातूर - ग्रामीण भागातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळेच सहा किलोमीटरचे अंतरही पार करू न शकल्याने लातूर तालुक्यातील वरवंटी गावच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
खराब रस्त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचा रिक्षातच मृत्यू मेहजुद्दीन काझी (वय 53 वर्षे) यांना शुक्रवारी (दि. 11 सप्टें.) हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे गावातील नातेवाइकांनी उपचारासाठी त्यांना लातूरकडे पाठविण्यासाठी रिक्षा केली. मात्र, खराब रस्त्यामुळे ही रिक्षा गावाबाहेर येताच फसली. अथक प्रयत्न करून ग्रामस्थांनी ही रिक्षा बाहेर काढली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. मेहजुद्दीन काझी यांनी रिक्षामध्येच अखेरचा श्वास घेतला.
एकीकडे विकासकामांचा गाजावाजा केला जात असला तरी, वाडी-वस्तीवरील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. म्हणूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या लातूर शहरात दाखल होण्यापूर्वीच काझी यांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या सहा किलोमीटर रस्त्याचे काम रखडले आहे. मात्र, या खराब रस्त्यामुळे मेहजुद्दीन काझी यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ह्या रस्त्यासाठी आणखी किती जणांना जीव द्यावे लागेल, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा -दारूबंदीसाठी बोरगावात तरुणाचे 'शोले' स्टाईल आंदोलन