लातूर Parliament Attack : बुधवारी संसदेत मोठा राडा झाला. लोकसभेचं कामकाज चालू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली आणि स्मोक बॉम्ब फोडला. यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला. या दोघांनाही सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचवेळी संसदेच्या बाहेरही गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दोन जणांना सभागृहाच्या बाहेर घोषणाबाजी करताना ताब्यात घेण्यात आलं आहे.
संसदेबाहेर दोघांना ताब्यात घेतलं : संसदेबाहेर घडलेल्या घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. नीलम आणि अमोल शिंदे अशी त्यांची नावं आहेत. नीलमचं वय ४२ वर्षं असून, ती हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहे. तर अमोल शिंदे हा लातूरचा रहिवासी आहे. त्याचं वय २५ वर्षे आहे. आता या अमोल शिंदेबद्दल अधिक माहिती समोर आली आहे.
एकजण लातूरचा : अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील झरी (नवकुंडाची) येथील रहिवासी आहे. त्याचं फारसं शिक्षण झालेलं नाही. तो शेतात कामं करतो. तो मातंग समाजाचा आहे. यामुळे या प्रकरणाचा मराठा आरक्षणाशी कसलाही संबंध नाही, असं सांगण्यात येत आहे. अमोलचे आई-वडील भूमिहीन शेतमजूर आहेत. ते इतरांच्या शेतात काम करतात. लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या तालुक्यात त्याचं गाव आहे.
भाजपा खासदाराच्या पासवर संसदेत प्रवेश मिळवला : लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारलेल्या तरुणाचं नाव सागर शर्मा आहे. तर दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे मनोरंजन डी. जो कर्नाटकातील म्हैसूरचा रहिवासी आहे. त्याचं वय ३५ वर्षे असून त्यानं बेंगळुरूच्या विवेकानंद विद्यापीठातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं आहे. भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासवर या दोन तरुणांनी संसदेत प्रवेश मिळवला होता. संसदेच्या आत आणि बाहेर गदारोळ करणाऱ्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा आणि गृहसचिव अजय भल्ला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संसदेत पोहोचले आहेत.
हे वाचलंत का :
- लोकसभेतील गोंधळावर अध्यक्ष ओम बिर्ला यांची प्रतिक्रिया, काय आहे महाराष्ट्र कनेक्शन
- संसदेत राडा! प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी मारल्या उड्या; वाचा नेमकं काय घडलं?