लातूर - विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच इच्छुकांनी निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. ज्या इच्छुकांना तिकीट मिळाले नाही, ते बंडखोरीच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. औसा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी मिळाली खरी, मात्र त्यांना अंतर्गत विरोध वाढताना दिसतोय. येथून भूमिपुत्रालच संधी द्यावी अशी मागणी होत आहे. मात्र, माझे नाव अभिमन्यू असून संघर्ष माझ्या पाचवीलाच पुजला असल्याचे पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा- राष्ट्रवादीची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; रोहित पवारांचा समावेश
हेही वाचा- दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंना ठेंगा; पत्ता कापल्याचे निश्चित?
औसा मतदारसंघ हा मूलतः शिवसेनेचा आहे. मात्र, यावेळी हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला आहे. यामध्ये इच्छुकांची गर्दी असतानाही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, पवार यांनी अंतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहे. माझ्या विरोधात बंड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे अभिमन्यू पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
अभिमन्यू पवार यांच्याशी बातचीत करताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर झाली असून पक्षाचा एबी फॉर्मही त्यांना मिळाला आहे. मात्र, भाजपकडून इच्छुक असणाऱ्या बजरंग जाधव तसेच सेनेचे माजी आमदार दिनकर माने व पालकमंत्र्यांचे बंधू यांनीही भूमीपुत्रालाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तसेच काही कार्यकर्त्यांनी औसा येथे रास्ता रोको करून पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची गाडी अडवून उमेदवार बदलण्याची मागणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांची मागणी वरिष्ठांकडे मांडणार असल्याचे सांगितले. त्यामुळे निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर संघर्ष हा उमेदवारी मिळविण्यासाठी असतो. उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षाच्या उमेदवाराच्या मागे राहणे हेच योग्य असते. मी ही तसेच केले असते. मात्र, स्वार्थसाठी असे राजकारण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.