लातूर - शहरासह संबंध जिल्ह्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भर पावसाळ्यात जिल्ह्यात 106 टँकर सुरू असून 1 हजारहून अधिक अधिग्रहण कायम आहेत. आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत केवळ 15 टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, हीच स्थिती कायम राहिली तर केवळ 2 महिने पाणी पुरेल, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.
लातूरकरांवर जलसंकट कायम : दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक त्याबरोबरच दरम्यानच्या कालावधीत शहराला 10 दिवसातून एकदा होणारा पाणीपुरवठा ही लांबवावा लागणार असल्याचे श्रीकांत सांगितले.
यंदा पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच पावसाने जिल्ह्यावर अवकृपा दाखवली आहे. पावसाची वार्षिक सरासरी ही 802 मिमी असताना आतापर्यंत केवळ 125 मिमी पाऊस बरसला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या तर खोळंबल्या आहेतच पण भर पावसाळ्यात प्रशासनाला पिण्याच्या पाण्याची चिंता आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण मृतसाठ्यात आहे. या धरणामध्ये आता फक्त 8 दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचा कितीही पुरवून वापर केला तरी यावर 2 महिनेच लातूरकरांची तहान भागणार आहे.
परिस्थिती चिंताजनक असून उर्वरित काळात तरी पावसाने हजेरी लावण्याची अपेक्षा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली आहे. इतर 138 लघु-मध्यम प्रकल्प कोरडेठाक असल्याने पाण्याची मागणी होताच टँकर सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट कायम आहे. उपाययोजनेबाबत महिन्याकाठी बैठका घेऊन आढावा घेत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. परंतु, ओढवलेल्या परिस्थितीशी सामना करावा लागेल एवढे नक्की असल्याचेही ते म्हणाले.