लातूर -कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचे पेव फुटले. यंदाचे शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन शिक्षण पद्धतीनेच सुरू झाले. आरटीअंतर्गत मिळणाऱ्या शिक्षणाचा लातूर जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र आहे. कारण कोणत्याच इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नोंदी अथवा म्हणावे तसे प्रवेश झालेले नाहीत.
आरटीई पात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अंधारात...पाहा स्पेशल रिपोर्ट शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र, अधिकचे शैक्षणिक शुल्क असल्याने गरीब कुटुंबातील विद्यार्थी हे इंग्लिश स्कूलच्या शिक्षणापासून वंचित राहतात म्हणूनच आर.टी.ई अंतर्गत अशा विनाअनुदानित इंग्लिश स्कूलमध्ये 25 जागा या आरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र, लातूरच्या जिल्हा परिषदेला याचे गांभीर्य राहिलेले नाही.
जिल्ह्यात 2033 विद्यार्थ्यांसाठी आर.टी.ई अंतर्गत मोफत प्रवेश घेता येणार आहे. मात्र, ऑनलाईन शिक्षणाला दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी केवळ 108 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाला ग्रहण लागले आहे. राज्यसरकार या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांची अनास्था आणि त्याचे परिणाम काय असतात हे लातूरच्या प्राथमिक शैक्षणिक विभागाकडे पाहिल्यावर लक्षात येते.
दरवर्षी, आर.टी.ई अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कागदपत्रे ही गटशिक्षण विभागाकडे सादर करावी लागतात. यंदा मात्र, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ही कागदपत्रे पालकांनी शाळेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले, अशा प्रकारे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी यांनी फिजकल डिस्टन्स तर पाळला. मात्र, शाळेकडे जमा झालेली कागदपत्रे जमा करून घेण्याचे औदार्यही शिक्षण विभागाने दाखविले नाही. शिवाय सतत सर्व्हर डाऊन यामुळे 2033 पैकी केवळ 108 प्रवेश झाले आहेत.
लातूर जिल्ह्यात आर. टी.ई अंतर्गत प्रवेश देणाऱ्या 235 शाळा आहेत. यामध्ये 25 टक्के आरक्षण प्रमाणे यंदा 2033 गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचा आहे. परंतु, प्राथमिक विभागाची अनास्था यामुळे 11 ऑगस्टपर्यंत केवळ 108 विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्यात आले होते. विनाअनुदानित शाळांनी ऑनलाईनद्वारे शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आता पहिल्या टेस्टचे वेळापत्रक शाळांनी विद्यार्थ्यांना दिले आहे, असे असताना आर.टी.ई अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न कायम आहे.
प्रक्रिया आहे ;मागे पुढे तर होणारच..
आर.टी.ई अंतर्गत 2033 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असताना केवळ 108 प्रवेश झाले आहेत. याबाबत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली जामदार यांना विचारणा केली असता, 'ही माहिती घेण्यास वेळ नाही. शैक्षणिक प्रवेश ही एक प्रक्रिया आहे,त्यामुळे ही मागे-पुढे हे होणारच' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे शिक्षणाधिकारी याबाबत किती गंभीर आहेत हे लक्षात येते.
ज्या उद्देशाने राईट टू एज्युकेशन सुरू करण्यात आले आहे, त्याचा उद्देश साध्य होताना दिसत नाही. एकतर हे विद्यार्थी मोफत प्रवेश घेतात म्हणून विनाअनुदानित शाळांकडून याला फारसे गांभीर्याने घेतले जात नाही पण ज्या विद्यार्थ्यांसाठी ही शासकीय यंत्रणा उभारण्यात आली आहे त्यांना देखील याचे सोयरसुतक राहिलेले नाही.