लातूर -आरोग्य सेवेचा कणा असलेल्या परिचारीकांच्या न्याय हक्कांसाठी आजपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाला सुरुवात झाली. त्याचे पडसाद लातूरातही उमटले. महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेच्या माध्यमातून स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील परिचारीकांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. आज (दि.21 जून) सकाळी 8-10 या वेळेत परिचारीकांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. 21 व 22 जूनला सकाळच्या सत्रात 2 तासांचे तर 23 व 24 जूनला पुर्णवेळ कामबंद आंदोलन करणार आहेत. हा शासनाला अल्टीमेटम असून शासनाने याची दखल न घेतल्यास आगामी 25 जूनपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे परिचारीका संघटनेच्या राज्य सचिव सुमित्रा तोटे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्र्याच्या जिल्ह्यात परिचारीकांचा एल्गार; 25 जूनपासून बेमुदत संपाचा इशारा - Vilasrao Deshmukh Government Institute of Medical Sciences news
स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील परिचारीकांनी आज (दि.21 जून) सकाळी 8-10 या वेळेत परिचारीकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. 21 व 22 जूनला सकाळच्या सत्रात 2 तासांचे तर 23 व 24 जूनला पुर्णवेळ कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1) सर्व स्तरावरील 100% कायमस्वरूपी पदभरती करुन अतिरिक्त बेडसाठी नव्याने पदनिर्मिती करण्यात यावी. परिसेविका/अधिसेविका/ पाठ्यनिर्देशिकांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. आवश्यक तेथे शैक्षणिक पदांची निर्मिती करण्यात यावी.
2) आपत्कालिन परिस्थितीत राज्यातील परिचारिका सवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता (नर्सिंग अलाउन्स) देण्यात यावा.
3) कोरोना काळात 7 दिवस कर्तव्यकाळ व 3 दिवस अलगीकरण रजा कायम ठेवून, बंद केलेली साप्ताहिक सुट्टी सुरु करण्यात यावी.
4) कोरोना काळात परिचारिकांच्या रजा स्थगित केल्यामुळे, अर्जित रजा 300 पेक्षा जास्त शिल्लक राहून रद्द होत असल्याने त्या पुन्हा घेण्याची परवानगी द्यावी.
5) केंद्र शासनाप्रमाणे परिचारिकांच्या पदनामात बदल करण्यात यावा. कर्नाटक सरकारने कोरोना काळात परिचारिकांचे पदनाम बदलून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
6) आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांकडून शासन मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना होणारा त्रास थांबविण्यात यावा.
7) सार्वजनिक आरोग्य विभागासाठी मंजूर करण्यात आलेले सेवाप्रवेश नियम लोकांसाठी अन्यायकारक असून त्यात योग्य ते बदल करण्यात यावेत.
8) परिचारीका कोरोनाबाधित झाल्यानंतर त्या रुग्णलयात दाखल झालेला कालावधी व विश्रांतीचा कालावधी हा गैरहजेरी/वैद्यकीय रजा न पकडता कोरोना विशेष रजा करण्यात यावी. विलंब वेतनही अदा करण्यात यावे.
9) परिचारिकांना केवळ रुग्णसेवेची कामे देण्यात यावी. अधिसेविका कार्यालय किमान 500-1500 मनुष्यबळ हाताळत असून त्या कार्यालयात लिपिक उपलब्ध करून दिल्यास तेथे ते कारकुनी कामकाज करणारे 5-10 कर्मचारी रुग्णसेवेसाठी उपलब्ध होऊ शकतात.
10) मृत परिचारिकांच्या कुटुंबीयांना विनाविलंब 50 लाखांचा विमा व इतर सर्वदेय आर्थिक लाभ तात्काळ देण्यात यावे. मृत परिचारिकांच्या कुटुंबियांना शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरी देण्यात यावी.
11) परिचारिका सवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी.
12) राज्यातील परिचारिकांना 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता विनाविलंब देण्यात यावा. महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम व केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता मंजूर करून विनाविलंब देण्यात यावा. त्यांच्या वेतनात कोणतीच कपात करू नये. या मागण्या यावेळी करण्यात आल्या.