लातूर -पक्षातील कार्यकर्ते हे कार्यकर्तेच राहतात तर नेत्यांची मुले- नातवंडे हे आमदार, खासदार मंत्री होतात, हे सूत्र आहे काँग्रेस पक्षाचे. त्यामुळे अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम करूनही पदरी निराशा आलेला काँग्रेसचा कार्यकर्ता माझ्याकडे आला आणि म्हणाला मी काय करू. तर मी त्याला आता 'घंटा' घेऊन वाजवत बस असा सल्ला दिल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. उज्वल भवितव्यासाठी भाजपलाच साथ देण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ आज देवणी येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी घराणेशाहीवरून काँग्रेसवर टीका केली.
भाजपला जनतेच्या हिताची काळजी आहे. मात्र, दुसरीकडे अगोदर घरातील सदस्यांना महत्व दिले जात असल्याचे सांगितले. शेती व्यवसाय अडचणीत आहे. त्यामुळे केवळ एका व्यवसायावर अवलंबून न राहता त्याला पूरक व्यवसाय सुरू करा अन्यथा स्थिती अधिक बिकट होईल. परिस्थिती कठीण आहे पण बदलायला पाहिजे ही काळाची गरज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इथेनॉलच्या शेतीचे महत्व पटवून देत होतो. आता ते लक्षात येऊ लागले आहे. इथेनॉलवर चालणारी टिव्हीएस बाईक तयार केली आहे. तुम्ही त्याचा वापर करा मी त्याची एजन्सी मोफत देत असल्याचे सांगत त्यांनी इथेनॉलचे महत्व सांगितले. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊ नका सर्वांगीण विकास लक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे जा. अन्यथा घोडे को नही घास और गधे खा रहे है चवनप्राश असे म्हणत त्यांनी काँग्रेला टोला लगावला.