लातूर- लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेसच्या मताधिक्यावर परिणाम झाला होता. लातूर शहरातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 22 हजार मते मिळाली होती. विधानसभेतही याचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात असतानाच राष्ट्रवादीचे नगरसेवक राजा मणियार यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी- काँग्रेसमध्येच मतविभाजन झाले तर येथील काँग्रेसच्या उमेदवाराला आमदारकीची गणितं जुळवणे कसरतीचे होणार आहे.
काँग्रेसची डोकेदुखी वाढणार ! राष्ट्रवादीचे नगरसेवक वंचितच्या गोटात - डॉ. अरविंद भातांब्रे
राष्ट्रवादीचे नगरसेवक राजा मणियार यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 2 दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील इच्छुकांनी या मुलाखतीस हजेरी लावली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक राजा मणियार यांनी सर्वांचे लक्ष वेधले. लातूर मनपामध्ये ते एकमेव राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. त्यांनी वंचितच्या मुलाखतीला हजेरी लावली असून पक्षांतर्गत होणारे मताचे विभाजन याचा सरळ फटका हा काँग्रेसच्या मतावर होणार असल्याचे बोलले जात आहे.
यातच वंचित आघडीचे नेते आण्णाराव पाटील यांनी विरोधी पक्षातील आमदार, खासदार, मंत्री हे संपर्कात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील इच्छुकांनी वंचितच्या मुलाखतीला गर्दी केली होती. तर निलंगा मतदारसंघातून डॉ. अरविंद भातांब्रे यांनी उमेदवारी मागितली असल्याचे समोर येत आहे.