लातूर - प्रेमप्रकरणातून दोघांमध्ये झालेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 27 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून; लातूर येथील घटना - लातूर खून बातमी
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 27 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे.
![मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून; लातूर येथील घटना murder-of-twenty-seven-year-old-young boy-in-latur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9316390-thumbnail-3x2-latur.jpg)
शहरातील विक्रमनगर भागात राहणाऱ्या अजय पिसाळ (25) व मोहित बावणे (27) यांच्यात एका मुलीवरून सातत्याने भांडणे होत होती. रविवारी रात्री 10 च्या दरम्यान या दोघांमध्ये भांडण झाले. शिवाय मागच्या भांडणाची सलही मोहितच्या मनात कायम होती. त्यामुळेच त्याने अशोक कापसे या मित्राला बोलावून घेतले व एक जणाला भेटायला जायचे आहे, असे सांगून अजय पिसाळ यास गाठले.
दरम्यान मोहित समोर दिसताच अजय आणि मोहित यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. मात्र, भांडण वाढत असल्याने अशोक याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अशोक याची भांडण सोडवण्यासाठी तगमग सुरू होती. पण, दोघांच्या भांडणात तू का येतो, असे म्हणत अजय पिसाळचा भाऊ विजय पिसाळ (27) याने चाकूने अशोकच्या गळ्यावर वार केले. यावेळी अशोक गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अशोकचे वडील शिवाजी कापसे यांच्या फिर्यादीवरून अजय पिसाळ, विजय पिसाळ यांच्यासह अन्य दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.