लातूर- यावर्षी लातूरकरांनी ओला आणि कोरडा, असे दोन्हीही दुष्काळ अनुभवले आहेत. निसर्गाच्या लहरीपणाला शेतकरी सामोरे जात असताना आता महावितरणनेही शॉक दिला आहे. ग्रामीण भागात सक्तीने वीजबिल वसुली केली जात आहे. एवढेच नाही तर मंडळनिहाय ठरवून दिलेली वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास ते लाईनमनकडूनच वसूल केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह महावितरणचे कर्मचारीही या अजब कारभारामुळे त्रस्त आहेत.
निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे संपूर्ण खरीप हंगामाला शेतकरी मुकला आहे. शिवाय, अंतिम टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीचा लाभ आता रब्बी हंगामाला होईल, असा आशावाद शेतकऱ्यांना असतानाच पेरणी लांबल्याने उत्पादनावर परिणाम होणार याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. असे असतानाच महावितरणकडून वीजबिल वसुलीची सक्ती ग्रामीण भागात केली जात आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशी स्थिती निर्माण झाली आहे.