लातूर - स्वतःचे घर झाडून घेण्यापूर्वी शहरातील रस्त्यांची साफसफाई करावी लागले. मगच घरातील सर्वांचा उदरनिर्वाह होतो. 'आधी हाताला चटके मग मिळते भाकर', अशीच काहीशी परिस्थिती असताना, लातुररातील सोनू वाघमारे या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. त्यांच्या कार्याचा जागतिक मातृत्व दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष आढावा.
तान्ह्या मुलाला घरी सोडून शहर स्वच्छतेचे काम... हेही वाचा-'हिजबुल मुजाहिदीन'ने घेतली हंदवारामधील हल्ल्याची जबाबदारी..
सकाळी शहराची साफसफाई आणि दुपारून चार घरची धुणी-भांडी करून सोनू कुटुंब चालवतात. मात्र, कोरोनाने उद्भवलेल्या परस्थितीमुळे अडचणीत आणखीच भर पडली आहे. पण परिस्थिती भयान असली तरी सोनू संकटावर मात करीत दोन मुलासह आईचा सांभाळ करीत आहेत.
'चला आपले लातूर स्वच्छ आणि सुंदर ठेवूया' ही ध्वनीफीत सकाळच्या प्रहरी लातूरकरांच्या कानी पडते. मात्र, हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी खरे हात राबतात ते सफाई कामगारांचे. लातूर महानगरपालिकेत 50 महिला सफाई कामगार आहेत. दिवस उजडण्यापूर्वीच या महिलांच्या हाती झाडू आणि कचरा टाकण्यासाठीचा गाडा असतो. यांच्यामुळे शरह स्वच्छ सुंदर दिसते. गतवर्षी लातूर मनपाला स्वच्छतेत राष्ट्रीय स्तराचे पारितोषिकही मिळाले. हा सर्व गाजावाजा होत असला तरी सफाई कामगारांना एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सोनू वाघमारे या 50 महिला सफाई कामागरापैकी एक आहेत.
पहाटे 5 वाजता ठरवून दिलेल्या प्रभागात स्वच्छतेचे काम नियमीत सुरू होते. गेल्या तीन वर्षांपासून सोनू हे काम करतात. यासाठी महिन्याकाठी 4 हजार रुपये मानधन मिळते. तेही महिन्याच्या-महिन्याला मिळेलच असे काही नाही. त्यामुळे सोनू स्वच्छतेच्या कामाबरोबरच धुणी- भांडी देखील करतात.
कोरोना महामारीने देशभरात लाॅकडाऊन लागले. आणि धुणी-भांड्याचे काम बंद झाले. कोरोनाच्या लढाईत सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस हेच खरे योद्धे आहेत. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी असणाऱ्या सोनू या पण कोरोना योद्ध्याच आहेत. मात्र, या योद्ध्याला लढाईसाठी आवश्यक असलेल्या साधनांचाही पुरवठा केला जात नाही.
मनपाकडून ग्लोज, मास्क दिले आहेत पण ते अपुरे. त्यामुळे एक दिवस मास्क तर दुसऱ्या दिवशी स्कार्फ तोंडाला बांधून काम करावे लागत आहे. काम करून घरी परतल्यानंतर लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी लागते.
सोनू आपल्या दोन वर्षांच्या मुलाला ओमकारला आजीजवळ सोडून कामावर जातात. नाईलाजास्तव तान्ह्या ओमकार आपल्या आईपासून दिवसभर वेगळे राहावे लागते. त्यामुळे आई कामारुन घरी कधी येते याची ओमकार वाट पाहत असतो.
घरी परतल्यावर सोनू यांना लागलीच ओमकारला कवेत घेता येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटाईझरने हात धुऊन, अंघोळ करूनच सोनू यांना ओमकार जवळ जाता येते. सोनू यांच्या पहिल्या मुलाचा आजारपणात मृत्यू झाला होता. शिवाय दुसऱ्या मुलाच्या प्रसंगीही त्या आजारी होत्या. त्यामुळे भविष्यातील चिंता त्यांना सतावत असल्याने त्यांनी भावाचाच चार महिन्याचा मुलगा ओमकार दत्तक घेतला आहे.
एकीकडे कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी करावे लागणारे परिश्रम आणि दुसरीकडे मातृत्व अशा दोन्ही गोष्टींची जबाबदारी सोनू यांच्यावर आहे. मात्र, परिस्थितीशी सामना करीत सोनू मेहनतीने कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्येही सकारात्मक दृष्टीकोन सोनू यांना कष्ट करण्यासाठी उर्जा देतो. मदर डे निमित्त सोनू यांना 'ईटीव्ही भारत'कडून सलाम...