लातूर - जिल्ह्यात उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामच महत्वाचा आहे. मात्र, यंदा पावसामुळे खरिपातील सर्वच पिके पाण्यात गेली होती. खरीपातून शेतकऱ्यांच्या पदरी पैसे तर पडले नाहीत, पण उत्पादनपेक्षा खर्चच अधिक झाला होता. आता उशिराने का होईना रब्बीच्या पेरणीचा श्रीगणेशा झाला आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ 13 टक्के पेरण्या झाल्या असून खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून निघणार का? हे पाहावे लागणार आहे.
लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र 6 लाख 4 हजार तर मुख्य पीक हे सोयाबीन होते. सोयाबीनला चांगली बाजारपेठही असल्याने शेतकऱ्यांना यामधून लाखोंचे उत्पन्न मिळते. यंदा मात्र, खरिपाच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत निसर्गाची अवकृपा राहिली होती. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकांची जोपासना करूनही अखेरच्या टप्प्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे तर नुकसान झालेच, शिवाय शेत जमीनही खरडून गेली होती. त्यामुळे खरिपातून शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडली होती. आता नव्या दमाने पुन्हा शेतकरी कामाला लागला आहे.
खरिपात झालेले नुकसान रब्बीतून भरून निघणार का 25 हजार हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा -
वेळप्रसंगी हात उसने पैसे घेऊन शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरली आहे. रब्बीचे एकूण सरासरी क्षेत्र हे 2 लाख 27 हजार 900 एवढे असून 5 नोव्हेंबर पर्यंत 31 हजार 42 हेक्टरवर पेरा झाला आहे. खरिपात जसे सोयाबीन मुख्य पीक आहे, त्याप्रमाणे रब्बीत हरभऱ्याचा पेरा अधिक प्रमाणात केला जातो. आतापर्यंत 25 हजार हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. सरासरी पेक्षा अधीक पाऊस झाल्याने शेत जमीनही चिबडली होती. त्यामुळे यंदा रब्बीच्या पेरण्याही लांबल्या आहेत. जमिनीची मशागत करणे, बी- बियाणांची खरेदी यामुळे महिन्याने पेरण्या या लांबणीवर पडल्या आहेत. नैसर्गिक संकटाचा सामना करीत पुन्हा बळीराजा नव्या दमाने उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. पण त्याच्या कष्टला निसर्गानेही साथ देणे तेवढेच आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी चढवली चाढ्यावर मूठ जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र 2 लाख 27 हजार हेक्टर एवढे आहे. यामध्ये हरभऱ्याचे 1 लाख 58 हजार हेक्टर हे एकट्या हरभऱ्याचे क्षेत्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 25 हजार 400 हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना हरभरा या मुख्य पिकातूनच अपेक्षा आहेत.
यंदा रब्बीसाठी पोषक वातावरण-
पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी रब्बीला पोषक वातावरण असल्याचे कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले आहे. पेरण्या रखडल्या असल्या तरी रब्बीतील सर्वच पिकासाठी अनुकूल वातावरण आहे. शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करून पेरा करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.
महिन्याभराने पेरण्या लांबल्या, केवळ 13 टक्के पेरा
खरिपातील पिके वावरातच असताना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतजमिनीत पाणी साचले होते. परिणामी रब्बीच्या पेरण्या महिन्याभराने लांबल्या आहेत. 2 लाख 27 हजार हेक्टर रब्बीचे क्षेत्र असताना आतापर्यंत 31 हजार हेक्टरवर पेरणी झाली असून पैकी हरभरा हे 25 हजार हेक्टरवर पेरा झाला आहे.