नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 हटवल्यानंतर मोबाईल सेवा खंडित करण्यात आल्या होत्या. हे निर्बंध आज (सोमवार) हटवण्यात येणार आहेत. सर्व पोस्टपेड मोबाईल सेवा दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाल्या. मात्र, इंटरनेट सुविधा सुरू झालेल्या नाहीत. तरीही मोबाईलवरून संपर्क सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कन्सल यांनी याविषयी शनिवारी माहिती दिली. 'जम्मू-काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता येथील उर्वरित क्षेत्रांमध्येही मोबाईल फोन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी 14 ऑक्टोबर 2019 पर्यंत या सेवा काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये पूर्ववत सुरू होतील,' असे ते म्हणाले.