निलंगा (लातूर) -तालुक्यातील अनेक गावामध्ये सोयाबीन पीकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. कारण, सोयाबीनला कमी शेंगाची लागण झाली आहे. त्यातच सोयाबीनवर किड्यांचा संसर्ग होऊन करप्या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. म्हणून शासनाने ताबडतोब अशा सोयाबीनचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत मनसेने तहसीलदारांकडे केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत मागणी केली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे सोयाबीन आहे. पण, बोगस बियाणे बाजारात आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट आले. सुदैवाने चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन चांगले आले असे वाटत असतानाच सोयाबीनच्या शेंगाची लागण कमी झाली. त्यातच करप्या, कीड लागून सोयाबीनची पाने अनेक ठिकाणी गळून गेली. सोयाबीन वाळलेसुद्धा सोयाबीनच्या उत्पन्नावरच शेतकऱ्याचे वार्षिक आर्थिक व्यवहार चालतात आणि नेमके तेच पीक गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.