लातूर - अभिनेता अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केबीसी कार्यक्रमातील एका प्रश्नावर आक्षेप घेत गुन्हा नोंद करण्यासंदर्भात तक्रार नोंद केली होती. परंतु, यानंतर यामागचा हेतू साध्य होत नाही. शिवाय राजकारण करून सामाजिक तेढ निर्माण केली जात असल्याने ही तक्रार मागे घेण्यात आल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
.. म्हणून आमदार पवारांनी घेतली अमिताभ बच्चन अन् सोनी टीव्हीविरोधातील तक्रार मागे
अभिमन्यू पवार यांनी सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात ऑनलाइन पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली होती. त्यांनतर एकच चर्चा रंगली होती. आता गुन्हा नोंद होणार का, याची चर्चा सुरू असतानाच 4 नोव्हेंबरला अभिमन्यू पवार यांनी तक्रार मागे घेतली आहे.
28 ऑक्टोबरच्या 'कोन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व त्यांच्या अनुयायांनी 1927मध्ये कोणत्या पुस्तकाच्या प्रति जाळल्या होत्या, असा प्रश्न स्पर्धकाला विचारला होता. या प्रश्नाकरिता चारही पर्याय हिंदू धर्माशी संबंधित होते. जर प्रश्नामागचा हेतू शुद्ध असता तर चार पर्यायांमध्ये भिन्न धार्मिक ग्रंथाची नावे आली असती पण तसे झाले नाही. त्यामुळे तक्रार नोंद करण्यात आली होती. यानंतर चौकशी होऊन कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, काहीजण याचे राजकारण करू लागले व मुख्य हेतू बाजूला राहत असल्याने ही तक्रार मागे घेतल्याचे अभिमन्यू पवार यांनी म्हटले आहे. विनाअट ही तक्रार मागे घेतली असल्याचे वकील ऍड. विशाल दीक्षित यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
सर्वकाही ऑनलाइनच -
अभिमन्यू पवार यांनी सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात ऑनलाइन पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली होती. त्यांनतर एकच चर्चा रंगली होती. आता गुन्हा नोंद होणार का, याची चर्चा सुरू असतानाच 4 नोव्हेंबरला अभिमन्यू पवार यांनी तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे हा स्टंट होता का असादेखील सवाल उपस्थित केला जात आहे.
काय होता प्रश्न...?
प्रश्न - 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी यापैकी कोणत्या शास्त्राच्या प्रती जाळल्या?
पर्याय- १) विष्णु पुराण २) श्रीमद् भगवद्गीता) ३) ऋग्वेद ४) मनुस्मृति असे पर्याय देण्यात आले होते.