लातूर -जिल्ह्यात वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता 15 दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, 31 जुलैनंतरही लातूर शहरात 15 दिवसाचे लॉकडाऊन वाढविण्यात आले होते. यामुळे उद्योग व्यवसायांना ब्रेक लागले असून सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे वाढीव लॉकडाऊन मागे घ्यावे आणि यामध्ये शिथिलता करण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजाराच्या घरात गेली आहे. शिवाय आतापर्यंत 111 जणांचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने 15 जुलै ते 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होती. 15 दिवसानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. मात्र, लातूर शहरात लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले.