लातूर :जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेतील तत्कालीन लिपीक मनोज नागनाथ फुलबोयणे यांच्याकडे तहसीलदार सर्वसाधारण जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्याचा कारभार होता. दि.26 मे 2015 ते 17 मार्च 2021 पर्यंत त्यांनी या खात्याचे कामकाज पाहिले. या बँक खात्याला मनोज बोयणे यांचा मोबाईल नंबर संलग्न करण्यात आलेला होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधी खात्याचे कामकाजही तेच हाताळत होते.
शासकीय अपहाराचे बिंग फुटले : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरण या बाबींसाठी निधी वितरण करण्याचा आदेश होता. जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना दोन धनादेश देण्यात आलेले होते. रु.12,27,297 आणि रु.41,06,610 असे आरटीजीएस प्रणालीद्वारे निधी वितरण करण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर शाखा येथे धनादेश, आरटीजीएस फॉर्म जमा करण्यात आलेले होते. परंतू ही रक्कमच जमा झालेली नव्हती. त्यामुळे जलसंपदा विभागातून त्याचा पाठपुरावा करण्यात आला. बँकेच्या सदरील खात्यामध्ये केवळ 96, 559 रुपये शिल्लक असल्याचे दिसून येत होते. या खात्याचे कामकाज मनोज नागनाथ फुलेबोयणे हे सांभाळत होते. यातूनच फुलबोयने यांच्या शासकीय अपहाराचे बिंग फुटले.
लेखापरिक्षण करण्याचे आदेश : जिल्हाधिकारी यांनी या खात्याचे लेखापरिक्षण करण्याचे आदेश काढले. त्याचप्रमाणे तहसीलदार सर्वसाधारण यांचेही बँक खाते मनोज नागनाथ फुलेबोयणे हेच सांभाळत होते. त्यामुळे या खात्यामध्येही अपहार झालेला असावा, असा संशय घेऊन त्या खात्याचेही लेखापरिक्षण करण्याचे आदेश काढण्यात आले. 2014-15 चे लेखापरिक्षण करण्यात आले. मनोज फुलेबोयणे या लिपीक महाशयांनी तहसीलदार रुपाली रामचंद्र चौगुले यांच्याही बनावट स्वाक्षऱ्या केलेल्या असल्याचे निदर्शनास आले. शासकीय रक्कम खाजगी खात्यामध्ये वर्ग करुन घेतलेली आढळून आली.
बनावट स्वाक्षरीच्या आधारे गैरव्यवहार : तन्वी कृषी सेवा केंद्र आणि तन्वी ॲग्रो एजन्सी या बँक खात्यावर अनेक वेळा रक्कम वर्ग करण्यात आलेल्या आढळून आल्या. विशेष म्हणजे या दोन्ही फर्मच्या बँक खात्यांचे सर्व व्यवहार हे मनोज नागनाथ फुलेबोयणे हेच हाताळत असल्याचेही निदर्शनास आले. त्याचप्रमाणे सुधीर रामराव देवकत्ते यांच्या नावे असलेल्या बँक खात्यामध्येही तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीच्या आधारे रक्कम वर्ग करण्यात आलेली आढळून आलेली आहे. अरुण नागनाथ फुलेबोयणे प्रोप्रायटर असलेल्या ऋषीनाथ ॲग्रो एजन्सी बोरी या नावाने असलेल्या बँक खात्यामध्येही रक्कम वर्ग करुन घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. चंद्रकांत नारायण गोगडे यांच्या नावे असलेल्या बँक खात्यामध्येही मनोज फुलेबोयणे यांनी रक्कम वर्ग करुन घेतलेली होती.
अपहार प्रकरणी गुन्हा दाखल : फुलेबोयणे प्रोप्रायटर असलेल्या ऋषीनाथ ॲग्रो एजन्सी बोरी या नावाने असलेल्या बँक खात्यामध्येही रक्कम वर्ग करुन घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. चंद्रकांत नारायण गोगडे यांच्या नावे असलेल्या बँक खात्यामध्येही मनोज फुलेबोयणे यांनी रक्कम वर्ग करुन घेतलेली होती. या अपहार प्रकरणी मनोज नागनाथ फुलेबोयणे, अरुण नागनाथ फुलेबोयणे, सुधीर रामराव देवकत्ते आणि चंद्रकांत नारायण गोगडे यांच्या विरुध्द तब्बल 22 कोटी 87 लाख 62 हजार 25 रुपयांच्या शासकीय रक्कमेच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी मनोज फुलबोयने (रा.बोरी ता.जि.लातूर), व चंद्रकांत गोगडे या दोघांना अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी अद्याप अटक नसल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
आर्थिक व्यवहारांची चौकशी :आरोपी मनोज फुलबोयने याने फक्त दोन ठिकाणच्या शासकीय बँक खात्यातून केलेला हा अपहार समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. त्याच्या एकूण शासकीय कार्यकाळात त्याने ज्या ज्या ठिकाणी शासकीय पदावर काम केले, त्या ठिकाणच्या सर्व आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केल्यास अपहाराच्या रकमेचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा :Latur Crime : गुंगीचे औषध देऊन अनाथ मुलीवर बलात्कार, पाच जणांविरोधात लातूरात गुन्हा