लातूर - यंदा जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळ नव्हे तर, अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. गेल्या 15 दिवसांपासून सततचा होणारा पाऊस तसेच काही मंडळात झालेली अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उदगीर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शिवारातील पिकांची राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शनिवारी पाहणी केली. सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरवर्षी पावसाअभावी उत्पादन घटत असते. यंदा मात्र, परिस्थिती वेगळी असून सततच्या पावसामुळे पिके पाण्यात गेली आहेत. खरीप हंगामातील पीक काढणीच्यावेळी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 15 दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे तूर, मूग, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील 74 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. शनिवारी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर तालुक्यातील धकनाळ, बोरगाव, नागलगाव, टाळली, सुमठाणा व कासराळ गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे न भरून निघणारे नुकसान असल्याने सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.