लातूर - लातूर शहरापासून नजिक असलेल्या निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याची फसवणूक केल्या प्रकरणी अहमदनगर येथील एका व्यक्तीला नांदेड येथून लातूर पोलिसांनी अटक केली असून, अन्य दोघांना नांदेडच्या कारागृहातून ताब्यात घेतले आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी हेही वाचा -Teachers day special : 'बाला'च्या संगतीने माणूस घडविणारा क्रियाशील शिक्षक 'प्रकाश जाधव'
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्या निवळी येथील साखर कारखान्यातील 8 हजार 364 मेट्रिक टन साखर निर्यात करायची होती. त्यासाठी तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील 'कुरिंजी प्रोनॅचरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'चे प्रतिनिधी अभिजीत देशमुख याच्यामार्फत कंपनीसोबत करार करण्यात आला होता. त्यानुसार निवळीच्या कारखान्यातून साखर घेऊन गेल्यापासून 90 दिवसांच्या आत सदरील साखर निर्यात केल्याबाबतचे कागदोपत्री पुरावे कारखाना प्रशासनास सादर करणे आवश्यक होते. असे असताना कागदपत्रे कारखान्यास सादर केलेली नाही. कारखाना प्रशासनाने वेळोवेळी कंपनीकडे कागदपत्रांची मागणी केली, तेव्हा कागदपत्रे देण्यास कंपनीने टाळाटाळ केली. त्यामुळे, साखर कारखान्याचे 8 कोटी 73 लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर कंपनीचे संचालक व इतर जबाबदार पदाधिकारी यांनी संगनमत करून कारखान्याची साखर खुल्या बाजारात विक्री करून आर्थिक नुकसान करत फसवणूक केली आहे.
याबाबत निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याचे विधी सहाय्यक अशोक तोडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी अभिजीत वसंतराव देशमुख याला आता अटक करण्यात आली आहे. आरोपी अभिजीत देशमुख याने दिलेल्या माहितीवरून प्रदीपराज चंद्राबाबू (वय 34, तामीळनाडू) व एडीगा उर्फ मनीकांत उर्फ मुनीकृष्णा (वय 39, तामीळनाडू) या अन्य दोन आरोपींना नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
कुरींजी प्रोनॅचरलचा म्होरक्या अद्याप फरारच
मुरुड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अटक करण्यात आलेला पहिला आरोपी अभिजीत देशमुख हा या फसवणूक प्रकरणात कुरींजी कंपनी व विलास कारखाना यांच्या व्यवहारातील मुख्य दुवा म्हणून काम पाहत होता. अन्य ज्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले ते दोघे नांदेड येथील अशाच एका गुन्ह्यात नांदेड येथील कारागृहात होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड येथील सहकारी साखर कारखान्यातील फसवणूक प्रकरणातही ते आरोपी आहेत. परंतु, 'कुरींजी प्रोनॅचरल प्रायव्हेट लिमीटेड कंपनी' च्या संचालक मंडळाचा प्रमुख असलेला बालाजी उर्फ पांडू शेट्टी हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
हेही वाचा -..तर लातूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई; महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा इशारा