लातूर - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्य सरकार तर मदत करेलच, पण केंद्रानेही मदत करण्याची अपेक्षा महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत. तर अगोदर राज्य सरकारने मदत जाहीर करावी, असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. पण, ज्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच 30 ते 40 हजार कोटींची कर्जमाफी दिली, ते आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर कसे सोडेल? त्यामुळे मदत तर केलीच जाणार असल्याचा विश्वास पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील निलंगा, औसा, लातूर ग्रामीणसह जळकोट परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राजकीय नेते तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पीक पाहणी केली आहे. त्यानुसार पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात या पावसामुळे 2 लाख हेक्टरहून अधिकचे क्षेत्र बाधित झाले आहे. कोरोनाचा सामना करीत असताना सरकार अडचणीत आहे. यातच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा परस्थितीमध्ये केंद्र सरकारची पथकही राज्यात दाखल होतील आणि पीक पाहणी करतील. पण, ज्या सरकारने सत्ता स्थापन होताच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ते सरकार आता आशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर कसे सोडेल? वेळप्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली असल्याचेही अमित देशमुख यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेऊन त्यांनी अधिकारी-कर्मचारी यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत.