लातूर - काळाच्या ओघातही शेती व्यवसायात म्हणावा तसा बदल झालेला नाही. आजही पारंपरिक पीकेच घेतली जातात. मात्र, सध्याच्या लॉकडाऊनचा विचार करून शेतात राबले तर पदरी काय पडेल, याचा विचार करून अहमदपुरातील एका मामा- भाच्याने तब्बल 9 एकरात भाजीपाला लागवड केली. यातून सध्या ते लाखो रुपयाचे उत्पन्न घेत आहेत. मामाचे शेत आणि भाच्याने राबवलेला अनोखा उपक्रम दोघांनाही यश मिळवून देत आहे.
मामा-भाच्याच्या जोडीने शेतीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न... अहमदपूर येथे माधव भदाडे यांचे फोटोग्राफीचे दुकान आहे. अनेक वर्षांपासून भदाडे याच व्यवसायात असल्याने चांगले बस्तान बसले होते. परंतु, कोरोनाच संकट आले, आणि व्यवसायाचेच स्वरूप बदलावे लागले. दुकानात असलेल्या 10 ते 12 कामगारांनीही गाव गाठले. ओढवलेल्या परिस्थितीने हताश न होता माधव यांनी सध्याच्या मार्केटचा अभ्यास केला.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा आणि भाजीपाला विक्री सुरू आहे. त्यामुळे या काळात यापैकी एक व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला. पण किराणा दुकानावर मर्यादा येणार म्हणून त्यांनी भाजीपाला व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पण शेतच नसल्याने भाजीपाला करावा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला.
मामाचे शेत आणि भाजीपाल्याचा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. याबाबत बाळासाहेब तीर्थंकर यांना कल्पनाही दिली. दरवर्षी पारंपरिक पिकाने पदरी तर काही पडत नाही पण भाचा सुशिक्षित आहे. यामाध्यमातून का होईना उत्पादन निघेल, या आशेने मामानीही परवानगी दिली. मग अहमदपूर-अंबाजोगाई या मुख्य मार्गावरील 9 एकरात मिरची, कारले, पपई यासारख्या 14 प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली.
सेंद्रीय खत टाकून भरघोस उत्पादन निघण्यास सुरवात झाली आहे. शिवाय भाजीपाल्याची देखभाल करण्यासाठी 10 ते 12 मजुरांच्या हाताला कामही मिळाले आहे. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये सर्वकाही बंद आहे पण किराणा, दूध आणि भाजीपाला हा बंद होऊ शकत नाही म्हणून त्यांनी हे धाडस केले. भाजीपाल्याचा फड मुख्य रस्त्याला लागूनच असल्याने त्यांनी या मार्गावरच भाजीपाला विक्रीचे दुकान थाटले. गेल्या 15 दिवसांपासून भाजीपाला विक्रीला सुरुवात झाली आहे. आतपर्यंत 2 ते अडीच लाखांची उलाढाल झाली आहे. यामधून 10 लाखापेक्षा अधिक उत्पादन भाचा माधव भदाडे आणि त्यांचे मामा बाळासाहेब तिर्थकर यांना मिळाले आहे. कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण वेगळा मार्ग निवडूनही लाखो रुपये कामावयचे कसे हे या मामा- भाच्याने दाखवून दिले आहे.