महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातुरात 'खंब्याने' केला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या करिअरचा बेरंग, कर्मचाऱ्याला 'या'साठी मागितली होती दारूची पार्टी - ACB

लातूरमध्ये दारुचा खंबा आणि आणि तीन बिअरच्या बाटल्यांची लाच मागितल्याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

दारुचा खंबा अन् बिअरच्या बाटलीने केला डॉक्टरचा घात

By

Published : Jun 1, 2019, 11:36 AM IST

Updated : Jun 1, 2019, 12:41 PM IST

लातूर- दारूच्या नशेसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील श्रेणी 'अ' वर्ग २ च्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने चक्क कर्मचाऱ्याच्या नोकरीसंदर्भातील अहवालासाठीच दारूच्या पार्टीची लाच मागितल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे. ऐन पार्टीत रंग चढत असतानाच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि अधिकाऱ्याच्या कारकीर्दीचाच बेरंग करून टाकला.

'खंब्याने' केला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या करिअरचा बेरंग

आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यास सन २०१८-१९ च्या कामातील अहवालात 'बी+' असा शेरा देण्यात आला होता. मात्र, याचा परिणाम आपल्या नोकरीवर होईल म्हणून तक्रारदाराने हा शेरा 'ए+' करण्याची विनंती निवळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वरीष्ठांकडे केली. याकरिता वैद्यकीय अधिकारी भालचंद्र हरिहर चाकूरकर (वय ४३) यांनी चक्क पार्टीची मागणी केली.

त्यानुसार शुक्रवारी रात्री लातूर-औसा रोडवरील एका हॉटेलात ही पार्टी रंगात येणार होती. पार्टीसाठी मागणी केल्याप्रमाणे एक दारूचा खंबा आणि ३ बिअरच्या बाटल्याही मागविण्यात आल्या. परंतु, ऐन दारूचा पेग तोंडाला लावतानाच लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याचा बेरंग केला.

गतवर्षीच्या कामात सर्वश्रेष्ठ दर्जा देण्यासाठी या वैद्यकीय अधिकाऱ्याने पार्टीची मागणी केल्याची तक्रार २८ मे रोजीच लाचलूचपत विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री लाचलूचपत विभागाचे पोलीस अधिक्षक संजय लाटकर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक माणीक बेंद्रे, पोलीस निरिक्षक वर्षा दंडिमे, कुमार दराडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून लाचेच्या साहित्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यास ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ९८० रुपयांच्या दारूने वैद्यकीय अधिकऱ्याची पूर्ण नशा उतरली असून विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Last Updated : Jun 1, 2019, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details