लातूर- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्याभरापासून लातूर शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर आजपासून शहरातील बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे, सकाळपासूनच नागरिकांची रस्त्यावर वर्दळ पाहावयास मिळत आहे. शहरात पानटपऱ्या आणि हॉटेल्स वगळता सर्वकाही सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार २४३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पैकी २ हजार २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे लातूर शहरात आहेत. त्यामुळेच १५ दिवसाचे लॉकडाऊन महिनाभर वाढविण्यात आले होते. यात लातूर शहर वगळता नगरपालिका आणि नगरपरिषद या ठिकाणी नियम, अटी शिथिल करण्यात आले होते. मात्र, शहरातील लॉकडाऊन १५ ऑगस्टपर्यंत कायम होते. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील व्यापारी उद्योजक यांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या, त्यांनतर आजपासून सर्व बाजारपेठ खुली करण्यात आली आहे.