लातूर- महिन्याभराच्या लॉकडाऊनंतर लातूर शहरात नागरिकांसह वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवेला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली असून किराणा दुकान, भाजी मंडई, मेडिकल तसेच इतर सेवा सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या नियमांचे पालनही लातूरकरांकडून केले जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 15 जुलैला 15 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. 15 दिवसांनंतर नगरपालिका आणि नगरपरिषद या ठिकाणी सर्व व्यवहार सुरू करण्यात आले होते. मात्र, लातूर शहरात कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याने 15 ऑगस्टपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्याने बाजारपेठ खुली केली जात आहे. सुरुवातीस किराणा दुकान, भाजी मंडई, मटण- चिकन शॉप, मेडिकल यासारख्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शुकशुकाट असणारे रस्ते दोन दिवसांपासून गजबजलेले पाहावयास मिळत आहेत.