लातूर - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यातील मराठा समाज पुन्हा संतप्त झाला आहे. राज्यात आंदोलनांची मालिका सुरू झाली आहे. आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर हलगी वाजवत ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठल्यानंतरच सरकारी नोकर भरती करण्यात यावी. मराठा आरक्षणाबाबत सर्वच आमदारांनी आग्रही भूमिका घ्यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.
मराठा आरक्षण: शिक्षक आमदाराच्या घरासमोर हलगी वाजवून ठिय्या आंदोलन - मराठा क्रांती मोर्चा विक्रम काळे घर मोर्चा
राज्यातील मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी जोरदार आंदोलने सुरू आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा धडाका मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे. आज लातूरचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर हलगी वाजवून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात मराठा समाजाच्यावतीने आंदोलने केली जात आहेत. आरक्षणाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असली, तरी राजकीय नेत्यांनी यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे अनेक तरुणांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यातच राज्यसरकारने पोलीस भरती घेण्याचे ठरवले आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजातील अनेक तरुण यापासून वंचित राहतील. त्यामुळे ही भरती करू नये, अशी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे.
शिक्षक आमदार विक्रम काळे यांनीही आंदोलकांनी दिलेले मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलकांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. मराठा आरक्षण कायम रहावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे काळे यांनी सांगितले. दरम्यान, दोन दिवसांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आली.