लातूर - टाळेबंदी काढल्यानंतर शहरातील सर्व बाजारपेठ सुरू झाली आहे. कोरोनाचे संकट अजूनही गेले नसल्याने भीती कायम आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क घालण्याकडे नागरिक व व्यावसायिकांकडून दुर्लक्ष होत आहे.
कोरोनाशी लढण्यात प्रशासन, नागरिक आणि सर्वांचेच निम्मे वर्ष गेले आहे. तरीही अनेकांना मास्क घालण्यासारख्या साध्या नियमाचा विसर पडलेला आहे. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या मास्क वापरण्याबद्दल शहरातील नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. मास्क न वापरण्याची कारणे ऐकली तर, तुम्हीही अवाक व्हाल. यावर 'ईटीव्ही भारत'ने केलेला हा विशेष रिपोर्ट आहे.
मास्क न वापरण्याची लातूरकरांची कारणे ऐका शहरातील टाळेबंदी 15 ऑगस्टनंतर हटविण्यात आली. मात्र, सोशल डिस्टन्स आणि मास्क वापरण्याची सक्ती कायम आहे. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणीही अनेक नागरिक मास्कचा वापर करीत नाहीत.
मास्क घालण्याच्या नियमाकडे दुर्लक्ष
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गंजगोलाईत शेकडो कामगार हे कामाच्या शोधात एकत्र आले असतात. मात्र, या ठिकाणी कोणत्याही नियमांची अंमलबजावणी होत नाही. जिल्हा प्रशासनाने वारंवार सूचना केल्या आहेत. जागोजागी जनजागृती केली आहे. पोलीस अधिकारी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत.
ईटीव्ही प्रतिनिधीने विचारले असताना काही नागरिकांच्या खिशात मास्क होता. मास्क का घातला नाही, असे विचारले असता क्षुल्लक कारण त्याने सांगितले. एका नागरिकाने तर कोरोनाची भीती वाटत नाही. त्याचा परिणामच दिसत नाही, असे अजब उत्तर दिले.
अशी आहे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती
जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 18 हजारांहून अधिक झाली आहे. तर 2 हजार 300 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रोज 200 ते 250 नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. असे असताना अगदी क्षुल्लक कारणे पुढे करीत अनेकजण मास्क घालणे टाळत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियम जाहीर केले आहेत. पण, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्यानेच कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहेत.