लातूर -यंदाच्या पेरणीपासूनच शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपता संपत नाही आहे. पेरणीनंतर पावसाने चांगलीच उघडीप दिली. त्यामुळे कोवळे मोड पुढे वाढलेच नाहीत. रिमझिम पडलेल्या पावसाच्या थेंबा-थेंबाने उरली सुरली रोपे हळू-हळू मोठी होऊ लागली तेव्हा निराश झालेल्या बळीराजाच्या पिकाला नवसंजवनी मिळाली. मात्र, शेतकऱ्यांच्या हातची मूग, उडीद यांसारखी नगदी पिके हातून गेली होतीच. त्यामुळे सोयाबीन, ज्वारी, कापूस या खरिपाच्या पिकांवरच शेतकऱ्याची दिवाळी अवलंबून होती.
खरिपाच्या पिकांची दुरावस्था; शेतकऱ्याने कवितेतून मांडली व्यथा.. बैलपोळ्याच्या आसपास वरुणराजाने थोडी कृपादृष्टी दाखवली. त्यामुळे शिवारातील पिके डोलू लागली. थोड्याच दिवसात शिवारातील पिके काढणीस आली. त्यातच, परतीच्या पावसाने आपली हजेरी लावली आणि शेतातील उभे पीक आडवे केले.
विधानसभेच्या धामधुमीत ना राजकारण्यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष गेले ना प्रसारमाध्यमांचे. त्यामुळे मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. विशेष म्हणजे, व्हिडिओमध्ये हा शेतकरी आपल्या शेतातील पूर्णपणे वाया गेलेले पीक उचलून दाखवत हे गाणे सादर करत आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणीत सापडत चालला आहे. यावर सरकारकडून केवळ घोषणांचे मलम लावले जात आहे. तर, प्रसारमाध्यमेही सध्या इतर विषयांनाच महत्त्व देत आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सोशल मीडियाचा मार्ग अवलंबला आहे. हे पाहून तरी शेतकऱ्यांच्या अडचणीकडे सरकारच्या नजरा फिरतील का? असा सवाल या शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहाणाऱ्या प्रत्येक नेटकऱ्यांना पडलाय..
हेही वाचा : 'मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा', शेतकऱ्याची मागणी