महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरमध्ये दोन मतदारसंघाचे चित्र स्पष्ट; इतर ४ मतदारसंघामध्ये चुरशीची लढत - maharashtra election result

सद्यस्थितीला केवळ लातूर ग्रामीण आणि निलंगा मतदारसंघाबाबत शिक्कामोर्तब होत असले तरी उर्वरित 4 मतदारसंघातील लढती या चुरशीच्या होणार आहेत हे नक्की.

latur district

By

Published : Oct 23, 2019, 7:53 PM IST

लातूर - मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडताच, बाजी कोण मारणार यावरून गेल्या दोन दिवसांपासून तर्क-वितर्क मांडले जाऊ लागले आहेत. मतदानाचा घसरलेला टक्का आणि जातीय समीकरणे मांडून वेगवेगळ्या पद्धतीने निकालाचा ठावठिकाणा घेण्याचा प्रयत्न सर्वचजणच करीत आहेत. ग्रामीण भागातील पारावर आणि शहराच्या चौकाचौकात एकच चर्चा असली तरी लातूर ग्रामीण आणि निलंगा वगळता इतर मतदारसंघाचे निकाल सद्यस्थिला व्यक्त करणे अशक्य झाले आहे.

जिल्ह्यात लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर असे सहा मतदारसंघ आहेत. लातूर शहर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजा मणियार यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. नेमका त्यांनी घेतलेल्या मतांचा फटका आमदार अमित देशमुख यांना बसतो की, भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना, यावरच या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे. गतवेळी 49 हजारांनी निवडून आलेले अमित देशमुख हे यंदा काटावर पास होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. शिवाय या मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले असून घरी बसलेले मतदार कोणत्या उमेदवारला घरी बसवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी व्यक्त केले आहे.

लातूर ग्रामीणचे चित्र स्पष्ट आहे. भाजपचा हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला असून येथे राजकारणात नवखे असलेले सचिन देशमुख हे निवडणूक लढवीत आहेत. पण याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख निर्विवाद वर्चस्व निर्माण करतील. त्याचप्रमाणे निलंगा मतदारसंघात यावेळीही काका अशोकराव पाटील-निलंगेकर आणि पुतण्या संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यात लढत आहे. परंतु, याठिकाणीही पुतण्याच बाजी मारेल असा अंदाज वर्तवला जात आहे. औसा मतदारसंघात भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. भाजपातील बंडखोर बजरंग जाधव हे किती मताधिक्य घेतात याचा परिणाम प्रमुख पक्षाचे उमेदवार अभिमन्यू पवार आणि बसवराज पाटील यांच्यावर काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लातूरमध्ये कोण मारणार बाजी

बंडखोरी, अंतर्गत मतभेद यामुळे काय होणार हे सध्या तरी न उलगडणारे कोडे आहे. तिकडे उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघातही ऐनवेळी भाजपातून बंडखोरी झाली होती. त्यामुळे अहमदपूर मतदारसंघात भाजपचे विनायक पाटील, वंचितच्या आयोध्याताई केंद्रे, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील तर अपक्ष उमेदवार दिलीप देशमुख हे प्रमुख उमेदवार राहणार आहेत. यामुळे वंचितचे उमेदवार आणि अपक्ष म्हणून असलेले दिलीप देशमुख यांना होणाऱ्या मतदानाचा फटका हेच या मतदारसंघातील निकालाचे गमक राहणार आहे.

उदगीरमध्येही भाजपकडून सुधाकर भालेराव यांना डावलून डॉ. अनिल कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांचे आव्हान राहणार आहे. मात्र, नाराजांनी घड्याळाला अंतर्गत मदतीचा हात पुढे केला तर येथील निकालही बदलल्याशिवाय राहणार नाही, असे चित्र आहे. त्यामुळे सद्यस्थितीला केवळ लातूर ग्रामीण आणि निलंगा मतदारसंघाबाबत शिक्कामोर्तब होत असले तरी उर्वरित 4 मतदारसंघातील लढती या चुरशीच्या होणार आहेत हे नक्की.

ABOUT THE AUTHOR

...view details